शहराला मिळणार तिसरे एसटी चार्जिंग स्टेशन

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : एसटी महामंडळाच्या पर्यावरणपूरक ई-बसेसच्या (शिवाई) सुलभ संचालनासाठी शहरात आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ई-बसेससाठी नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम वेगाने सुरू झाले असून, हे शहरातील एसटीचे तिसरे चार्जिंग स्टेशन असणार आहे.
सध्या शहरात विभागीय नियंत्रक कार्यालय परिसर आणि चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा येथे ई-बसेससाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे. आता तिसर्‍या स्टेशनसाठी रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलाजवळ अनेक वर्षांपासून रिकामी पडून असलेली एसटी महामंडळाची जागा निश्चित करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसर हे शहराचे मुख्य वाहतूक केंद्र असल्याने, या नव्या स्टेशनमुळे ई-बसेसची चार्जिंगसाठी होणारी धावपळ थांबणार असून प्रवासी वाहतूक अधिक सुकर होणार आहे.